Viewing:

ईयो. Job 19

Select a Chapter

देव आपल्या निर्दोष ठरवील ही ईयोबाची खातरी

1नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला,

2“तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात?

3तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे.

तुम्ही कठोरतेने माझ्याबरोबर वागता त्याची लाजही बाळगत नाही

4जर खरच मी काही चुक केली असेल तर,

ती चुक माझी मला आहे.

5तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे,

माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता.

6मग तुम्हास हे माहीती पाहिजे कि,

देवानेच मला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे.

7‘पाहा, असे मी ओरडतो कि मी चुकीचे केले आहे, पण कोणी ऐकले नाही.

मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्याय मिळत नाही.

8मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला.

त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे.

9देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली.

आणि त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला.

10माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो.

एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत.

11त्याचा क्रोध मला जाळीत आहे,

तो मला त्याचा एक शत्रू असे संबोधतो.

12त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो

ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात,

आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.

13त्याने माझ्या भावांना माझ्यापासुन फार दूर केले आहे,

माझ्या सर्वांना दूर ठेवण्याचा अनुभव त्याने मला दिला आहे.

14माझे नातलग मला सोडून गेले आहेत,

माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत.

15माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात,

मी त्यांच्या दृष्टीने उपरा झालो आहे.

16जरी मी माझ्या मुखाने याचना केली,

माझ्या नोकराला बोलावले, तरी तो मला उत्तर देत नाही,

17माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते,

माझे स्वतःचे भाऊ आणि बहिणी माझा तिरस्कार करतात.

18लहान मुलेदेखील मला चिडवतात,

जेव्हा मी बोलायला जातो तेव्हा ते माझ्या विरूद्ध बोलतात.

19माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात.

माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुध्द गेले आहेत.

20मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते,

मी केवळ दाताच्या कातडीने बचावलो आहे.

21माझी दया येऊ द्या, मित्रांनो, तुम्हास माझी दया येऊ द्या!

कारण देवाचा हात मजवर पडला आहे.

22तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात.

माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का?

23अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे!

अहो, ते पुस्तकात नमुद करून ठेवायला हवेत.

24अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर

किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे.

25माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे.

आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील.

26मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल

तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन.

27मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन,

माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही.

माझा अतंरात्मा झुरत आहे.

28या सगळ्याचे मूळ माझ्याकडेच आढळून आले आहे,

म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल.

29तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी,

कारण रागामुळे तलवारीने शासन होते,

यावरुन तुम्हास कळेल की न्याय आहे.”