Viewing:

लूक Luke 22

Select a Chapter

यहूदाने केलेला विश्वासघात

मत्त. 26:1-5; मार्क 14:1, 2, 10, 11; योहा. 11:45-53

1नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला. 2मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल या बाबतीत चर्चा करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.

3तेव्हा बारा प्रेषितांपैकी एकात, म्हणजे यहूदात इस्कर्योतामध्ये सैतान शिरला. 4यहूदा मुख्य याजक लोक व परमेश्वराच्या भवनाचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरुन देता येईल याविषयीची बोलणी केली. 5त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्यास पैसे देण्याचे मान्य केले. 6म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधी शोधू लागला.

शेवटल्या भोजनाची तयारी

मत्त. 26:17-19; मार्क 14:12-16

7बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला. 8तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की, “जा आणि आपणासाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.” 9पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?” 10तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हास भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा. 11आणि त्या घरमालकास सांगा, ‘गुरुजींनी तुम्हास विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ 12तो मनुष्य तुम्हास माडीवरील सजविलेली खोली दाखवील तेथे तयारी करा.” 13तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.

शेवटले भोजन

मत्त. 26:20-30; मार्क 14:17-26; योहा. 13:21-30

14वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या प्रेषितांसह भोजनास बसला. 15तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती. 16कारण मी तुम्हास सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.” 17नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा. 18कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षरस घेणार नाही.” 19नंतर त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.” 20त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे. 21परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे. 22कारण मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा पण ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार.” 23आणि ते आपापसात एकमेकाला प्रश्न विचारु लागले, “हे करणारा आपणापैकी कोण असावा?”

खरा मोठेपणा

24तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत मोठा कोण आहे. 25तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभूत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे वाटतात. 26परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे. 27तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. 28परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात. 29ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ती केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो. 30म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.

पेत्र आपणांस नाकारील हे येशू आधीच सांगून ठेवतो

मत्त. 26:31-35; मार्क 14:27-31; योहा. 13:36-38

31शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे. 32परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.” 33परंतु शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभू, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.” 34पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”

35येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हास थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठवले, तेव्हा तुम्हास काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.” 36तो त्यांना म्हणाला, “पण आता, ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्याने पिशवीसुद्धा घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकावा आणि ती विकत घ्यावी. 37मी तुम्हास सांगतो, तो अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्याठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्या विषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.” 38ते म्हणाले, “प्रभू, पहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “तेवढे पुरे!”

गेथशेमाने बागेत येशू

मत्त. 26:36-46; मार्क 14:32-42; योहा. 18:1

39मग तो निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. 40तेव्हा त्याठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.” 41तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली, 42“पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 43स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्यास सामर्थ्य देत राहिला 44दु:खाने ग्रासलेला असतांना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. 45आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पाहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले. 46तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का झोपत आहात? उठा आणि परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”

येशूला अटक

मत्त. 26:47-56; मार्क 14:43-52; योहा. 18:1-11

47तो बोलत असतांनाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एकजण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला. 48परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय?” 49त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?” 50त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला. 51येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले. 52नंतर येशू मुख्य याजक लोक, परमेश्वराच्या भवनाचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे. 53मी तर तुम्हाबरोबर दररोज परमेश्वराच्या भवनात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची वेळ आणि अंधाराची सत्ता आहे.”

पेत्र येशूला नाकारतो

मत्त. 26:69-75; मार्क 14:66-72; योहा. 18:13-18, 25-27

54त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्यांच्यामागे चालला. 55त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्याभोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला. 56तेव्हा कोणाएका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.” 57पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्यास ओळखत नाही.” 58थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!” 59नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एकजण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालील प्रांताचा आहे.” 60परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असतांना त्याच क्षणी कोंबडा आरवला. 61आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्यास आठवले. 62मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.

63येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली. 64त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्यास प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?” 65आणि ते त्याची निंदा करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.

मुख्य याजकांपुढे येशू

मत्त. 26:57-68; मार्क 14:61-64; योहा. 18:12-14; योहा. 18:13-24

66दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली आणि ते त्यास त्यांच्या सभेत घेऊन गेले. 67ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हास सांग” येशू त्यांना म्हणाला, जरी “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. 68आणि जरी मी तुम्हास प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही. 69पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.” 70ते सर्व म्हणाले, तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय? त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही म्हणता की, मी आहे.” 71मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.”