Viewing:

नीति. Proverbs 19

Select a Chapter

1ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा

जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.

2ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही,

आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.

3मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो,

आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते.

4संपत्ती खूप मित्रांची भर घालते,

पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.

5खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,

आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.

6उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात;

आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे.

7गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात,

तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार!

तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.

8जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो,

जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.

9खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,

पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.

10मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही,

तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.

11बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो,

आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे.

12राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे,

पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.

13मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे;

आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.

14घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे,

पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.

15आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो,

पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.

16जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो,

पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल.

17जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो,

आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील.

18काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर,

आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.

19रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे;

जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल.

20सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार,

म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील.

21मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात,

पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.

22प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते;

आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.

23परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे;

आणि तो जीवनाकडे नेतो,

आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे,

आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.

24आळशी आपला हात ताटात घालतो,

आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.

25निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल,

बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.

26जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो,

तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.

27माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले

तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील.

28भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो

आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते.

29निंदकासाठी धिक्कार

आणि मूर्खाच्या पाठीसाठी फटके तयार आहेत.